संचित कर्मातील कोणती कर्मे फलोन्मुख (प्रारब्ध) व्हावीत हे कोण ठरविते ? संचितकर्म अचेतन असल्यामुळे ते ठरवू शकणार नाही. जीवही ठरवू शकणार नाही. कारण त्याला संचित कर्मच माहीत नाही. ईश्वरही ठरवू शकणार नाही. कारण तो अन्य कामे सोडून हा खटाटोप कशासाठी करील ?
कर्म आणि ज्ञान यांचा संबंध
ज्ञानाने कर्म नष्ट होते असे भगवद्गीता म्हणते. कर्म फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही या कर्मसिद्धांताला त्यामुळे बाधा येत नाही काय ? हा प्रा. आपटे यांचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर ‘सिद्धांतश्रेणी‘ हे आहे. कर्मसिद्धांतापेक्षा ज्ञानसिद्धांताची श्रेणी श्रेष्ठ असून ज्ञानसिद्धांताचा अमल कर्मसिद्धांतावर चालत असल्यामुळे कर्म फळ न देतासुद्धा ज्ञानामुळे नष्ट होऊ शकते. याचे समांतर उदाहरण भौतिक विज्ञानात सापडते. भौतिक विज्ञानातील नियमांवर अतींद्रिय विज्ञानातील नियम अंमल गाजवताना दिसतात. उदा. भानामतीमध्ये निर्जीव (जड) वस्तू गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध वागताना दिसतात; (विज्ञान आणि चमत्कार – अद्वयानंद गळतगे) विशुद्धानंदासारखे योगी आकाशगमन करतात, (स्वामी विशुद्धानंद परमहंसदेव – नंदलाल गुप्त) ‘डायनॅमो’ हा सिद्धपुरुष पाण्यावरून चालतो’ (हिस्टरी’ वाहिनी) इत्यादि. ईश्वर हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे ईश्वरकृपेनेही संचित व प्रारब्ध कर्म नष्ट होऊ शकते. प्रा. आपटे यांचा प्रश्न असा की ‘‘ज्याचे प्रारब्ध ईश्वरकृपेने नष्ट झाले तो तत्काळ मरावयास हवा. मात्र तसे घडताना दिसते काय ?” नाही, हे खरे आहे. पण त्याचे कारण ईश्वरकृपेतच (ज्ञानातच) आहे. प्रारब्ध नष्ट झाले म्हणजे तो मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला. तो मेलाच पाहिजे असे नाही. न तस्य प्राणा उत्क्रामेति । ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति । (बृ.उप. ४/४/६) असे मुक्त पुरुषाविषयी बृहदारण्यक उपनिषद् म्हणते. ‘इहैव ब्रह्माप्येति, न शरीरपातोत्तरकालम् ।’ असे यावर शंकराचार्यांचे भाष्य आहे. (म्हणजे तो येथेच ब्रह्माला प्राप्त होतो. शरीर पडल्यानंतर-मेल्यानंतर (परलोकात) नाही.) अशा व्यक्तीला जीवन्मुक्त म्हणतात. फिरणाच्या चाकावरून मातीचे भांडे कुंभाराने तयार करून काढून घेतल्यानंतर ते चाक प्रारंभिक गतीने थोडा वेळ फिरत राहते. तसे जीवन्मुक्ताचे शरीर त्याच्या कर्मगतीने आपोआप कार्य करीत राहते. ‘तैसे देहाभिमानु गेलिया । देह जेणे स्वभावे धनंजया । जाले ते आपैसेया । चेष्टवीच ते ।।” (ज्ञाने. १८/४२८) | अशा रीतीने (आत्मज्ञानामुळे अथवा ज्ञानस्वरुप ईश्वरी कृपेमुळे कर्म नष्ट होत असल्यामुळे ‘कर्म’ व ‘ज्ञान’ हे परस्परविरोधी आहेत असे ठरते. प्रा. आपटे यांचा प्रश्न असा की ‘‘ज्ञान व कर्म यात परस्पर विरोध आहे हे ठरविले कुणी ? त्या म्हणण्याला आधार काय ? तसेच कर्म आणि ज्ञान यांचा संबंध येतो तरी कुठे ?’ कर्म व ज्ञान यात परस्पर विरोध दृश्य जगाच्या निर्मितीमुळे निर्माण झाला आहे. दृश्य जगच या म्हणण्याला आधार आहे.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.