6 नाडी ग्रंथ प्रश्नोत्तरी
प्रश्न – नाडी म्हणजे काय?
उत्तर: नाडी हा शब्द मराठी भाषिकांना एक तर डॉक्टरांनी आरोग्यासाठी मणगटावर ठोके पाहून उपाययोजना करायची पद्धत असे माहिती असते, नाहीतर मराठी विनोदी नट स्व. दादा कोंडके यांच्या अजगळ चड्डीची आठवण येऊन हसायला येते. मात्र याशिवाय गेल्या काही वर्षांपासून नाडी शब्दाला आणखी एक अर्थ असतो याचा शोध कित्येक मराठी भाषिकांना लागला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात नाडीग्रंथ भविष्य कथन पद्धतीचे आगमन. नाडी या शब्दाचा तमिळ भाषेतील अर्थ ‘शोध घेणे’ असा आहे. या शब्दाच्या अनेक छटा ‘कोषात’ अत्यंत मोठ्या प्रमाणात साठवले ज्ञान किंवा संहिता आहे. या दोन्हीचा एकत्र अर्थ केला तर असे म्हणता येईल की, तमिळ भाषेतील ताडपत्रावरील कूट लिपीमध्ये कोरून लिहिलेली व्यक्तिविशेषाची भविष्य कथने म्हणजे ताडपत्रावरील नाडी पट्ट्या हे भविष्य ग्रंथ होत.
प्रश्न : नाडीग्रंथ कोणी लिहिले?
उत्तर: आपण ज्या महर्षींची नावे रामायण, महाभारत, भागवत आदी धार्मिक ग्रंथात वाचतो, त्या वसिष्ठ, विश्वामित्र उर्फ कौशिक, पराशर, भृगू, अगस्त्य, काक भुशुंड, शुक, अत्री, मार्कंडेय आदी महर्षींच्या नावाने नाडीग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय नंदी, पुल्ली पाणी, बोहर, मच्छ, कमल, सदानंद, जैमिनी, मीनाक्षी, धन्वंतरी आदी उत्तर भारतीयांना अपरिचित महर्षींनी ही नाडीग्रंथ लेखन केले आहे. प्रत्येक भविष्य कथनाच्या वेळी प्रथम शिव-पार्वतीला (ईश्वरचरणी) वंदना करून त्या त्या नाडीचे कर्ते महर्षी म्हणतात, ‘या जातकाचे (भविष्य जाणून घ्यायला इच्छुक व्यक्तीचे) भविष्य फळ कथन करण्यासाठी मला प्रेरणा द्या’ असा कृपा आशीर्वाद मागतात. एक – दोन श्लोकात शिव स्तुती केली जाते. त्यामुळे प्रत्येक महर्षीचे नावाने ग्रंथ रचना केली आहे असे मानावे लागते. तथापि हे रचना कार्य एका व्यक्तीच्या जीवनापुरते सीमित नसावे. पिढ्यानपिढ्या ते चालत आले असावे. म्हणून ती घराण्यातील कामामुळे उपनावात आजही कौशिक, अत्री, वसिष्ठ आदी आडनावाचे लोक विशेषतः उत्तर भारतात आढळू न येतात. आत्तापर्यंत अनेकांना अनुभवायला आलेल्या नाडी भविष्यातून ७२ महर्षींच्या कार्याचा उल्लेख येतो.
प्रश्न : नाडी ग्रंथ भविष्य का पहावे?
उत्तर: प्रत्येक व्यक्तीला जीवनात कठीण प्रसंगी नक्की मार्गदर्शन करणारे सापडत नाहीत. कोर्टात केस करावी का? त्यात अपयश येईल का? या प्रश्नाचे उत्तर कायद्याच्या विषयात निष्णात वकील, ‘तुम्ही हरणार – कोर्टाची पायरी चढू नका’ असे कधीच सांगत नाहीत. त्यांना केस जिंकता येणार नाही याची खात्री असूनही ते अशिलाला ‘नक्की जिंकून देतो’ असे छातीठोकपणे सांगतात. अशा वेळी अत्यंत रोखठोक शब्दात ‘केस लढू नये, हरावे लागेल’ असे नाडी ग्रंथातून खणखणीतपणे सांगून वेळीच जागे केले जाते. त्यामुळे एक निष्पक्ष सल्लागार म्हणून नाडी ग्रंथांचे अवलोकन केले जाते. नोकरी मिळणे, मिळाली तर न टिकणे, धंद्यात खोट, असाध्य रोग, रेंगाळली लग्ने, प्रमोशन अशा प्रापंचिक चिंता, प्रश्न भेडसावत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करून व्यक्तीच्या कर्तृत्वाला प्राधान्य दिले जाते. तथापि सर्व गोष्टी मानवी कर्तृत्वाच्या आवाक्यात नसतात. अभ्यास कसून करणे आपल्या हातात आहे, मात्र गुण देणे दर्जा ठरवणे आपल्या हातात नाही. तसेच आपल्या श्रम कष्टाशिवाय अन्य घटक – जे कार्याला यशस्वी करण्यासाठी लागतात – ते आपल्या बाजूने असावेत, निदान विरोधात जाऊ नयेत म्हणून काही धार्मिक पूजा – अर्चा, जपजाप, अन्नदान, वस्त्रदान, जलदान किंवा पैशाचे दान करायला सुचवले जाते. त्याद्वारे नाडीतून मार्गदर्शन मिळवून आपले पेच/तात्कालिक समस्यांचे निराकरण केले जाते. म्हणून एक विचार मार्गदर्शक, सद्भावनेचा सल्ला देणारे म्हणून नाडी ग्रंथ भविष्याचे अवलोकन करावे.
याशिवाय काहींना या भविष्य कथनाच्या पद्धतीचा ज्ञानाचा शोध घेण्याची इच्छा होते. त्यांना वैयक्तिक भविष्यात रस नसतो. पण ही संहिता, कधी, कशी, कुठे लिहिली असावी? कोणत्या लिपीचा वापर केला असावा? लेखन कार्य कसे केले असेल अशा जिज्ञासा आकर्षित करतात.
या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:
प्रश्न 1: एखाद्या नाडी केंद्रात नाडी पट्टी मिळाली नाही तर नव्या पट्ट्यांचा स्टॉक येईपर्यंत एक दोन महिने थांबा आणि नंतर विचार करा असे सुचवले जाते. तेवढा वेळ थांबणे शक्य नसते त्या वेळी काय करावे?
उत्तर: नाडी भविष्य पहायचे ठिकाण ज्या शहरात असेल त्या शहरातील अन्य नाडी केंद्रांची आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवावी. एके ठिकाणी निराशा झाली तर दुसरीकडे ते पहायला जाता येते. बऱ्याचदा अशा दुसऱ्या केंद्रात पट्टी सहज सापडून जाते. मात्र वेळेची अनुरूप आखणी करावी.
प्रश्न 2: शांतीदीक्षा कांडात सांगितलेली कर्मे करूनही नंतर भविष्य पाहिले तर पुन्हा शांतीदीक्षा करावी का?
उत्तर: अनेकांना उत्सुकतेपोटी, अनिवार्य घटनाक्रमामुळे किंवा सहजपणे नाडी ग्रंथ पहायची संधी येते. त्यातील भविष्य कथनाच्या समावेत काही पूजा अर्चा, जप आदी करायला सुचवले जाते. त्या वेळी साहजिकच मनात प्रश्न उद्भवतात की आधी केलेल्या शांतीदीक्षेचे काय? ती केली तर पुन्हा मी का करावी? प्रत्येक वेळी असे सोपस्कार करायचे तरी किती वेळा?
नाडीग्रंथांची रचना व्यक्तीच्या सांसारिक चिंता कटकटी, आजार यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी केलेली आहे. ज्या महर्षींनी प्रज्ञाचक्षूंनी भविष्य पाहिलेले आहे तसे आपल्या पूर्वी कर्मांची पूर्वी जन्मातील बऱ्या वाईट कर्मांची मांडणी देखील समजून येते. करुणेच्या सद्भावनेने त्यांनी एखाद्याला एकापेक्षा जास्त नाडी पट्ट्या पहायची संधी दिली तर त्यांना याचीही पूर्ण कल्पना असते की याने आधी सांगितल्याप्रमाणे शांतीदीक्षा केली किंवा नाही. कारण अनेकदा असे सरळ म्हटले जाते की पूर्वी सुचवूनही शांतीदीक्षा केलेली नाहीस आता तरी कर अन्यथाच कथन केलेले अपेक्षित भविष्य सफल होणार नाही. कधी महर्षी असेही म्हणतात, तू केलेली शांतीदीक्षा मला मिळाली, तरीही मी पुन्हा सुचवलेली शांतीदीक्षा जरूर करावी. या मागे महर्षींना त्याच्या पूर्वकमातील उरलेल्या कृत्यांसाठी आणखी शांतीदीक्षा करणे अपेक्षित असते. ही व्यक्ती पुन्हा नाडीग्रंथ पाहील त्यावेळी आणखी सोपस्कार सांगू. सर्व एकदम सांगितले तर पैसा, वेळ, मानसिक स्वास्थ्य या कारणांनी तो काहीच करणार नाही. याला हप्त्या हप्त्यात सांगणे संयुक्तिक ठरेल असे म्हणावे लागते. कधी कधी काही सोपस्कार करायची गरज नाही असे म्हटले जाते.

नाडी हा शब्द मराठी भाषिकांना एक तर डॉक्टरांनी आरोग्यासाठी मनगटावर ठोके पाहून उपाय योजना करायची पद्धत असे माहिती असते, नाहीतर मराठी विनोदी नट स्व. दादा कोंडके यांच्या अजागळ चड्डीची आठवण येऊन हसायला येते. मात्र याशिवाय गेल्या काही वर्षांपासून नाडी शब्दाला आणखी एक अर्थ असतो याचा शोध कित्येक मराठी भाषिकांना लागला आहे.